आंदोलन

 आंदोलन

     कोंबड्यानं बांग दिली अन् लगीच जागा झालू गजर झाल्याचं कळलं. आता कोंबड्यांन घायच  धरली हुती अन् भाईर कडाक्याची थंडी हुती. ह्यो गजर काय बंद हुतूया व्हय ? मोबाईलच घड्याळ बंद करता तर येतय, पर हे कुणी बंद करणार ? कारण मला या फुकटच्या घड्याळाची सवय झालेली. आता काय आमची पोरं मोबाईल वाजवत्यात पर हे मोबाईल बिबाईल, घड्याळ-बिड्याळ आम्हाला काय समजत नाय. आमचे हे फुकाटचं घड्याळ कधी खोटं टायमं सांगत नाय, कधी बंद भी पडत नाय, अन् पुढ-मागं बी व्हतं न्हाय. आमचं घड्याळ वर आभाळात सुर्य बघितला की लगीच काटा कुठाय ते म्या टाईम सांगतू. मोबील मधलं मला काय कळत न्हाय. म्या पोराला घिऊन दिलाय तेच्या हातात बघूनच. मन बाहरावून जातयं. च्यायला म्या उगीच बसलुया आज काय 'शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी' आंदोलन का काय ते हाई रस्ता बंद करायचाय म्हंण तिकडं जायचं हाय. गाडी जाईल पर घरचं शेणघान कोण ते मोर्चेकरी काढणार हायत व्हय? आपलं काम आपल्यालाच केलं पाहीजी. 
       "आवं उठला का न्हाय ? काय असचं दिसभर झोपायचं हाय व्हय ?"
       "अगं व्हय, म्या आलोच जरा शान काढून खराटा मारतू की."

         मग काय बायकुनं हाळी दिल्याबरोबर कामाला लागलू. थंडीने आंग कुडकुडत हुतं. पण तिच्या आवाजान गारठंच पळालं. वाढ्यात गेलू तर सगळ्या जनावरांनी वाढा भरला हुता काय ते म्हशीचा पव  (शेण) हाय, एका पवामध्यी एक पाठी भरतीच. तसंच शेळ्या मेड्यांच्या वाड्यात बी सगळा गजर वाड्यातच लेंड्याची रांगोळी काढली हुती. म्हसरांनी गजर चालु केलाच वयरण टाकायला. म्या म्हटलं "जरा दम-बीम हाय का न्हांय ? आता कुठं शेणाची पाटी उचलली तवर तुम्ही चालू केलं व्हंय? " तस म्या जरा हातात दांडक घेऊन वरडलु. पाटी भरून उकिरड्यात टाकू लागलू. गयांच बी हुंभ्या हुंभ्या चालू हुतं. ही आमची रोजची गाणी आयकतच काम करावं लागत. काय आता मोबीलची ऐयकन्या परास ही आमची जरा कळत्यात तर.
       शिरप्यान हाळी दिली "आर झालं का न्हाय? लगाच्या कसला आळशी हायस.....म्या सगळी काम आटपून बसलुया...... आवर लेका..... जायच हाय का न्हाय?  
       "व्हय...व्हय....बाबा झालच बघ आत्ताशी तयार हुतू. लगीच आंघुळ करून घेतू. आर गणप्याच काय झाल ? तो काय म्हणतोया?"
       ह्यो गणप्या रोज आळशी असणारा आज तयारी करून आमच्याकड आला. गणप्या मला म्हणातूया  "काय लेका रोज कस तुज असतय रे जरा लवकर आवरायचं नव्हतं व्हय. वयनीन थोड आवरल असतं की," लगीच वहिनी म्हणाली, "तुम्ही रोज काम धंदा सोडून असले उद्योग करायला जाशीला. अन वहिनी हाय, वयनीन काय मरायच हाय का काय ? काम धंदा सोडून कशाला असले उद्योग पाहिजेत तुम्हाला. तिथे जाऊन आता तुमाला काय मिळायचं हाय कुणास ठाऊक. उगीच येड्यागत जाताय. तुम्ही जाताय ती जाताय आन एकल बी  जात न्हाय. संग अजुन आमच्या मालकालाबी याड लावताय व्हय. आता काय म्या गप्पच हुतू चालूद्या म्हटलं आपलं कपडे वगैरे घालून चला म्हटल. याच्यामध्यी बोलाव तर उगीचच शब्दाला शब्द कशाला म्हटल. जाऊ दित्या ती बी जाऊ द्यायची न्हाय. आमचा गणू आला आन त्या दोघांच्या वादामध्येय बोलू लागला.
       "अग आई तुला काय झालय जाऊदेना त्यांना. अग सगळ्यांनी जर तुझ्या सारखा विचार करून घरातली काम करीत बसल तर त्या निर्णयाच काय त्याच्याविषयी कोण आवाज उठवणार? मग शेतकऱ्याला न्याय कसा मिळणार? आग आई लोकशाही राज्यात न्याय मिळत नसेल तर तो न्याय  भांडून मिळवण्याचा अधिकार आपल्याला हाय. जर तो आपण घेतला नाही तर देशाच्या स्वातंत्र्य सैनिक आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिवीरांना काय वाटेल? जाऊदे त्यांना." आई म्हणाली, "आर बाळा तुला शाळा शिकवली हाय माहित हाय. माझ्या बान मला न्हाय शिकवली. तुला शिकवली तू मला लय शिकवू नकोस आर त्यासाठी दुसरी कुठ गेल्यात होय?" आमची बायको काय गप बसायला तयार नव्हती. म्याच गणप्याला घेऊन गेलो. आता गणप्याच  बोलायला लागला "आर व्हय वहिनी म्हणत्यात ते खरच हाय. कशाला उगीच आपला काम धंदा सोडून जायचं" म्या म्हटल, "आर बाबा जर सगळ्यानी असच म्हटल  की आपलं काम करूया तर इकड कोण येणार ? याचा जाब कोण विचारणार? चल आपल गप उगीचच कसला तरी विचार करतूया. लय शाना व्हायला निघाला. आर चल बघूया," गेलो आंदोलनात सहभागी झालो आंदोलन सुरू झाल. टायरी पेटवून रस्ता रोखला.  भरपूर वेळ रस्ता रोखला. तिथं मग अनेकांची भाषन झाली आम्ही मग ती गपचीप आयकली आम्हाला कुठ फुढ जाऊन बोलायच जमतय. आन जमत असत तर आम्हीच आंदोलन केल नसत का? आता आंदोलनात कशाला कुठे तरी पैशाच्या नोकरीवर असतो. भाषणातून ही मागणी, ती मागणी, मागण्या निषेध असे विषय घेतले मग तिथे प्रशासकीय कर्मचारी येऊन निवेदन घेऊन आंदोलन मागे घ्यायला लावून तुम्ही म्हणतात्या त्या गोष्टीचा विचार करून त्या लवकरच आम्ही चालू करू. अंमलात आणू असे उत्तर दिले. मग आंदोलन मागे घेण्यात आल. मग काय आमास्नी बरं वाटलं खरंच हे  मनावर घेऊन काहीतरी करतील. पर नुसत निवेदन घेऊन ठेवत्यात हे कुणाला माहित हुतं. आंदोलनात आल्याली अनेक लोक म्हणत हुती, "यांनी जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर आपण पुढच्या वेळेस शासकीय कार्यालयातील वस्तूंची तोडफोड करायची, जाळपोळ करायची," हे मनाला बर वाटायचं पण दुसर्‍या वस्तू म्हंणजी शासनाच्या वस्तू जाळायच्या. मला मला वाटलं खरंच हे आपल्याला सुखात राहू देत न्हाईत. सारखी आमची पिळवणूक, इचारात घेत न्हाईत. मग हेच्या वस्तू कशाला ठेवायच्या? मग म्याबी म्हणलं, व्हय तस केल्याबिगार ह्या सरकारलाबी शेतकऱ्यांचा अंत कळायचा न्हाय. त्याचा तळतळाट  समजायचा न्हाय." म्या बी सुरात सूर मिसळून माझ्यातील कार्यकर्ता जागा केला. आंदोलन मागं घेण्यात आलं होतं त्यामुळे घरी आलो. आज जनावराकडं मालकिन गेली हुती. मी मग तिला जनावराकडं जाऊन घरी पाठवलं. मला ती म्हणाली "झालं का आंदोलन? काय म्हणाली? कोण आलती बिलती का न्हाय?" म्या म्हणल, "व्हय आलती. करतू म्हणाल्यात, बघूया आता." मग मालकिन घरी गेली. थोड्या येळानं मी बी जनावर घेऊन घरी गेलो.
         बराच येळ झाला होता. सगळी जनावर गोठ्यात बांधून वयरणी घालून आवरून बसलू हुतो, कडूसं पडलं हुतं आज काय जरा फिरून आल्यामुळे अंग ठणकत होतं. पोरगा अजून आलं नव्हतं. गणप्या आला म्हणाला, 'आर काय करतोया?" म्या म्हणालो  "काय न्हाय आपण आज गेलो हुतो की आंदोलनाला. तु लावलस वयनीला अन् म्याबी लावल माझ्या बायकोला. आता म्हणतीया आमाला जनावरामागं लावून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलनाला गेला, माझं जनावरासंग आंदोलन लावून. म्या बाई एकटी  काय करू ? काय सरळ हिंडत्यात का काय सारख त्यांना आडवायला लागतय. इतकी पळत्यात असली जनावर दमवत्यात तुम्हाला माहित असून गेलाय" म्हणते "काय झाल? कोण आलत का न्हाय? त्याची मी काय म्हणू........ त्यांना तो आमदार, खासदार, काय बोलल का काय न्हाय? नुसते मत मागायला येत्यात काम काय न्हाय करायची अन नुसत बोलायचं हे करतू ते करतू अन् एकदा का मतदान झालं की  तिकडंच कोण मेलय का जित हाय का ते बघायला सुद्धा येत न्हाईत. आपल्या गरिबांना कोण धनी, वाणी न्हाय आपन या शेतात जनावरागत काम करायची बी अन् मरायच बी आपल्या मागण्या कोण धेनात घेतया.  बघितलं नव्ह गेलाय आपल काम सोडून कोण येतय का तुम्हाला काम करू लागायला? तुम्ही गेला नसता तर मी म्हणत हुती हायब्रीड भागंलून काढला असत."
           "अंग व्हय, आत्ता शांत हो. उद्या कर म्याबी सकाळी लवकर जाऊन निम्म-आर्ध काढू लागतो."
             "आवं उद्या लसूण भांगलायचा हाय, का न्हाय खायचा लसूण तुमास्नी? नुसतं उद्या करून चालतंय व्हयं? हे शेतकऱ्यांकडे कोण लक्ष देत नसत्यात आन् तुम्ही गेलाय, काय मोडून फोडून आला य का नुसतं जाऊन आलाय."
             व्हयं, पुढच्या येळला तेच करायच हाय. म्हणून आलुया. पुढल्या बारीला आम्ही आस मोकळे  माघारी येणार न्हाय. तु म्हणायच्या आदी आम्ही हा सगळा इचार ध्यानात घिऊन आलुया. मग तर झाल?
          "बघा पुडच्या बारीला जनावर कशीतर राखते, पण काहीतरी झालं पाहिजे नुसत फिरून येऊ नका."
            "बघ अशी माझी मालकीन म्हणत हुती. तुला वयनी काय बोलली की न्हाय. म्या म्हणलो "न्हाय बाबा तिला आमच्या गणून सांगितलंय कस काय  हुतय ती. ती अजून गणू कसा काय आला न्हाय?"
         "आवं यील की, त्याला पोरातनी खेळू-बिळू देताय का न्हाय? "
         त्यो पळत आला. म्या इचारल "आर काय झाल? गणू म्हणाला, "मावशीला दवाखान्यात नेलयं म्हणं. आजारी पडलीया. आत्ताच फोन आलता. तुला माहित हाय का? कुठं कुठल्या दवाखान्यात हाय काय  सांगितलं का न्हाय?"
        "व्हय, आपण मागं एकदा गेलू नव्हतू व्हय. एसटी स्टँड शेजारी, तिथंच खालच्या बाजूनं रस्त्यानं जायचं हाय. तुम्हाला काय म्हाईत न्हाय व्हय."
           "आरं व्हय बाबा तवाचं आजून एवढं ध्यानात न्हाय." शहरातलं काय बी कळत नाय बाबा. तरीपण जाऊन बघतं जातू हुडकत. बरं आता तरी बरं वाटतंय का न्हाय इचार फोन लावून फोन लावून." काकाला फोन लावला, काकांनी फोन उचलला म्हणाले, "व्हय आता बोलतीया. जरा बरं वाटतंय म्हणतीये, सलाईन लावलीया काय एवढं काळजी करण्यासारखं न्हाय म्हटल्यात डॉक्टर." काळजी घ्या जरा म्हणून फोन ठेवला. आता म्हटलं उद्या तरी गेलं पाहिजे बघायला. मग उद्या जायचं ठरलं सकाळी लवकर जाऊया म्हटल. गणप्याला म्हटलं "उद्या आम्ही जाऊन बघून येतू. तवर तू जरा आमच्या जनावराकडे बघ पुढे घेऊन चल मी लवकर माघारी यील. "
             "बघतु की, आता असल्या अडचणीच्या टायमाला बघायचं न्हाय, तर कवा जा. लय काळजी करू नग. जनावराच म्या बघतुया, जावा तुम्ही. आरामात जावा."
            लवकर उठायचं म्हणून लवकर झोपलू. सकाळी कोंबड्याने बाग द्यायच्या आधी उठून शेंग-घाण गोठा साफ करून घेतला. तवर मालकिणीन सैपाक केला होता. आवरून एसटी स्टँड वरून गेलो थंडीचे दिवस होतं म्हटलावर थंडी तर वाजणारच. आता काय करणार कुणाला सांगणार लवकर जाऊन लवकर यायचं हुतं. तसंच थंडीत कुडकुडत एसटीची वाट बघत उभारलो. एसटी आज लेट झाली उशीर हितच झाला म्हटलं आता म्या तर काय करणार? आणि एसटी वाली तर काय करणार? कुणी आंदोलनात एसटीवर दगडफेक केली होती. दुरुस्ती वगैरे काय काय करून थोडी जरा चांगली करून आणली हुती. एसटीत बसलो तर सारी बोंबाबोंब म्या  बसलू हुतू तिथली खिडकी फुटली होती.  त्यातून गारगार वारा आत येत हुता. ते वार यायचं कसं बंद हुणार म्या तरी काय करणार? काच फुटली होती नवीन अजून बसवली नव्हती. गार वार यायला लागल हुत. काच फोडणाऱ्याचा मलाच राग येऊ लागला काय म्हणून फोडली असल काच फोडून काय मिळाला असेल त्याला? उगीचच प्रवाशांचे थंडीने हाल हुतया. मालकीन लगीच बोलू लागली "अशी एसटी  फुडून काय मिळतय आम्हाला यात आता थंडीत जाव लागतय. काय म्हणाव त्या फोडणाराला......."
            शहर बऱ्याच अंतरावर असल्याने जस शहर जवळ येत हुत तसा आमचा काचवरचा राग काय जाईना. पुढकाय रस्ता रोको आंदोलन सुरू होत. बगता-बगता आमची बीएसटी शहराजवळ आली हुती पण पुढे रस्ता बंद करून रस्त्यावर काही माणसे विविध मागण्यासाठी बसली हुती. मलाच काय कळना झालं. आता हेच आंदोलन कवा मग व्हायच अन कवा म्या शहरात जायचो. मालकीण म्हणाली "बघा रस्ता अडवून धरलाय म्हण पुढे आता केव्हा ही लोक रस्ता  सोडायची म्या म्हटलं हुतं लवकर बघून तीच बरी असली तर माघारी येऊन भांगलाच म्हटलं होतं जर ताईला जास्त झाल असल तर थांबायचं म्हटलं हुतं. अजून तिला बघायच्या आधीच रस्ता अडवून धरलाय यांना काय आजच येळ मिळाला काय. आम्ही यायचं संपान-बिपान पडलं हुतं की काय? काय म्हणणं ह्या  लोकांना रस्ता आठवून धरलाय. आमच्या साईटला बसली हुती त्यांची तर भलतीच कहाणी हुती. त्यांच्यातला मामा म्हणाला, "आव हे काय खरं न्हाय बघा. म्या काय करू काय कळत न्हाय माझ्या  मेव्हण्याच पोरग हित शहरात हाय कॉलेजला. मेव्हण्याला म्हटलं लावून दे बघू आमच्या भागात म्हणून हिकडे घातलं हुतं कॉलेजात. आन कुणाची गाडी घेऊन पोर-पोर कुठ फिरत होती कुणास ठाऊक गाडी धडकून  पडलाय म्हण. पोर घेऊन गेल्यात म्हण दवाखान्यात डॉक्टर काही रक्त वगैरे भरायला लागतय म्हणून सांगितलय. ऍडमिट केलय आता त्या पोराकडनी  तर कुठलं पैसे म्हणून म्या कळाल्या कळाल्या आम्ही दोघ घरातन निघालो. पण यांनी आत्ताच रस्ता अडवून धरलाय आणि मेव्हण्याला बी अजून कळवल नाही कसं काय झाला असल याचीच काळजी हाय बघा. दवाखान्यात जाऊन कवा बघीन असं झालंय. किती लागलय रक्त लवकर कुठनं तरी आणून दिले पाहिजे त्या दवाखान्यात हाय का न्हाय  ते बी माहित न्हाय अशात रस्ता रोको आंदोलनात एखाद्याचा जीव जायचा. ..."
           तिसरा प्रवासी म्हणाला, "आव आता आपण काय करणार? कुठलातरी नेता आला असल आंदोलन करायला" तर दुसरा म्हणाला "आव यांना काय काम धंदा हाय होय दुसर आन आपल्या सारखी माणसे भी त्यांच्या सारख्या मग आंदोलन करू लागायला येत्यात. आव ह्याच्यात दम हाय तर ह्यानी असा सामान्याचा, गोरगरिबांचा काय म्हणून रस्ता आडवायचा. त्याच काय त्या मंत्र्याला कसला त्रास बर अशान गोरगरीब गरीब राहतील त्याना दुसरे काय म्हयति हुणार हे माहिती हुन बी देत न्हाईत. माहिती झाली तर त्यांची खुर्ची रिकामी होईल. त्या जागी गरीब लोक जाऊन बसतील. म्हणून त्याना हे असं काहीतरी करायला लाऊन बसतात."
         "आर व्हय तू म्हणतुया ते बरोबरच हाय, आर ह्या आंदोलन करत्याची मुल शाळेत असतात. आन गरीबाची मुल आंदोलनात मरतात."
           श्रीमंतांची मुले शिकून मोठ्या-मोठ्या अधिकारी पदाच्या जागा घेतात. गरिबांना कुठे शिपाई, खाजगीत नोकरीमध्ये, आंदोलक असे काम करावी लागतात. म्हणून महात्मा फुले सांगतात, त्याप्रमाणे मुले शाळेत गेलीच पाहिजेत. आंदोलन आपण करूया की ते बोलतात ना, ते आमच्या पोरांना घेऊन आंदोलन करतात."
           "आव पावुन तुम्ही म्हणताय ते खरं हाय हे आंदोलन गरिबाशी आहे, हे गरिबांना कळत न्हाय. अवो आता रस्ता आडवलाय यात हित श्रीमंत, मंत्री -संत्री कोण हायत? एसटीत फोडत्यात एसटी मध्ये कोण असत? आपणालाच बसाव लागत ना, मग काय तोडफोड झाली ती आपणाला तरास होतुया. यांची भरपाई आपणालाच भरावी लागते बघा की,आता दोन  चार दिवसात तिकीट दर वाढतोय की, नाय बघा. आव हे भांडवल आहे ते आपले गरिबांचच आहे. हे फक्त सांभाळायला ते शिकलेले लोक आहेत आव त्यांना काय? आमचा रस्ता आडवण्यापेक्षा मंत्र्यांच्या गाड्या आडवाना? हे तसे करू शकत नाहीत. कारण त्यांना लोकांना नुसत्या भुलभलत्या थापा मारून भुलवायच हाय."
          "आव पावन मग आता मागण्या कशा महागाव्यात?"
         "अव तसं नव्हे त्यासाठी तुम्ही काळे झेंडे दाखवून शकता, निवेदन करू शकता, मूक मोर्चा, मोर्चा काढू शकता, फोडून काय नुकसान आपलच हुणार हाय आपल्याकडून ते दंडात्मक  दरडावून घेणारच हायत."
       म्या गप बसलू हुतो मला काय समजना असं झालं हुतं. तवर चार तास होऊन गेलं होतं. आंदोलन मागे घेतलं होतं कोण येऊन काय काय सांगून गेली हुती. शहरात जाऊन मग उतरलो दवाखान्यात गेलू मग दोघी बहिणी भेटल्या म्याबी जरा चौकशी केली बोललो तस एवढं काही काळजीच काम नव्हत. मालकिणीला तिच्याजवळ सोडून घरी आलो.
       मला कळलं होतं की, हिंसा करून, तोडून फोडून काय त्यांना बरं-वाईट नव्हतं. गरिबांना ते सर्व  भरावे लागत हुत. मग गरिबांना कशाला त्या भानगडीत पडावं तव्हापासून ठरवले जिथे शांतीने,  प्रेमाने मागणी करायची आहे तिथं जायचं. हिंसक मार्गाचा जायचं नाही आणि तिकडे जाणार बाबी समजावून सांगायचं. आपलीच आडवा आणि आपली जिरवायची नाही........

लेखक सरगर सुरेश सिताबाई किसन
मोबाईल नंबर 8605871150/9595279796
गाव घाटनांद्रे ता.कवठे महकाळ जि. सांगली

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

 एम ए 2 अर्थशास्त्र 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मतदान

Right To Vote

कोरोना एक अफवाच